पुणे : पुणे जिल्ह्यातील नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत आज मंगळवारी (दि.21) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ओतूरकडून कल्याण दिशेने जाणारी कार ( एमएच 16 एटी 9426 ) व कल्याणकडून ओतूरच्या दिशेने जाणारा टेम्पो (एमएच 14 एचजी 4991) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत चारजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामसुंदर जायभाये हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले व जखमींना आवश्यक ती मदत करीत त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान धडक झालेल्या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अपघातानंतर टेम्पो जागेवरच पलटी झाला.

या अपघातात सचिन भानुदास बेरड (वय 34) ,आश्विनी सचिन बेरड (वय 40), त्रिशा सचिन बेरड (वय 3), सर्व रा. नेहरूनगर भिंगार, जिल्हा अहमदनगर) तर टेंपोचालक विजय सुरेश नाडेकर (वय 26, रा. तळेरान. ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत.