दिल्ली : पूर्व दिल्लीतील गांधीनगरमध्ये अरविंद केजरीवाल यांची सभा झाली.यावेळी त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल याही सभेला उपस्थित होत्या. या सभेत बोलताना अरविंद  केजरीवाल यांनी भाजपवर आणि नरेंद्र मोदींवर जोरदार निशाना साधला. “अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार” असा नारा देत लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. अरविंद केजरीवाल यांनी सत्तेवर आल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनाचाही यावेळी पुनरुच्चार केला.

यावेळी बोलताना सुनीता म्हणाल्या की, तुमच्या आशीर्वादाचेच फळ आहे की आज माझे पती आमच्यासोबत आहेत. जे चांगलं काम करतात त्यांना देव मदत करतो. आता माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर 25 मे रोजी आपच्या बाजूने मतदान करा.

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळल्याबद्दल पत्नी सुनीता केजरीवाल यांचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांना ‘झाशीची राणी’ म्हटलं. सोमवारी निवडणूक सभांमध्ये सुनीता केजरीवालही पहिल्यांदाच अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिसल्या.

गांधीनगर येथील सभेत केजरीवाल म्हणाले की, “आज मी माझ्या पत्नीलाही सोबत घेऊन आलो आहे. माझ्या अनुपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. मी जेलमध्ये असताना ती मला भेटायला यायची. मी तिला माझ्या दिल्लीकरांच्या आरोग्याबद्दल विचारायचो आणि माझा निरोप तुम्हाला पाठवत असे. ती झाशीच्या राणीसारखी आहे.” “मी तुम्हाला सांगतोय की,मोदीजींचे सरकार चार जूनला स्थापन होणार नाही. त्यांच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्वत्र लोक त्यांच्यावर नाराज आहेत, लोकांनी त्यांना सत्तेवरून हटवण्याचे ठरवले आहे. चार जून रोजी अच्छे दिन येणार आहेत आणि मोदीजी जाणार आहेत”.