टोप (प्रतिनिधी) : मित्राकडे होळी खेळण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना काल (सोमवार) दुपारी मौजे वडगांव येथे घडली. मयत तरूणाचे नाव धर्मेंद्र तुरहा (वय 26, रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. कबनुर इचलरंजी, ता. हातकणंगले) असे असून या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धर्मेद्र तुरहा हा इचलकरंजी येथून धुलीवंदन साजरी करण्यासाठी मौजे वडगांव येथे आपल्या मित्रांच्याकडे आला होता. त्यावेळी रंगपंचमी खेळत असताना किसन माळी यांच्या मालकीच्या शेतातील गट नं. 236 मध्ये असलेल्या विहीरीच्या काठावरुन अचानक पाय घसरुन पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.