बिलासपूर ( वृत्तसंस्था ) हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत. हा मृत विद्यार्थी वसतिगृहात राहत होता. रविवारी तो त्याच्या रूम मेटसोबत खोलीत होता. साडेअकराच्या सुमारास त्याने आपल्या रूममेटला वॉशरूममध्ये जाण्यास सांगितले. मात्र त्यानंतर त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारली.

बिलासपूर एम्समध्ये शिकणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने रविवारी हे पाऊल उचलले. एका पॅरामेडिकल कर्मचाऱ्याला अचानक पडण्याचा मोठा आवाज आला. तेथे त्यांना एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत आढळला, तेथून त्याला तातडीने आपत्कालीन स्थितीत नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेत या घटनेचा तपास सुरु केला आहे.