पुणे (प्रतिनिधी) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याचा निकाल तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे. याप्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. तर दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

याप्रकरणी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली. त्यांना 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. तर वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहायक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

न्यायलयाने याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवला होता. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेवर कट रचल्याचा आरोप होता. परंतु, सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळं त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

त्यासोबतच संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नसल्यानं त्यांना न्यायलयानं निर्दोष ठरवलं आहे. विशेष सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी या प्रकरणाचा संपूर्ण निकाल जाहीर केला आहे.

तर मुक्ता दाभोळकर यांनी, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना शिक्षा झाली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र, ज्या तीन जणांना शिक्षा झाली नाही, ज्यांना निर्दोष सोडण्यात आलं, त्यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाणार असल्याचे सांगितले.