कागल  (प्रतिनिधी) : छ. शाहु साखर कामगार युनियन मार्फत एखादा कामगार जर मयत झाला तर त्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून एकूण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या एक टक्के रक्कम देण्याची योजना कारखान्याचे संस्थापक राजे स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी सुरू केली आहे. मागील काही दिवसात कारखान्याचे आठ कर्मचारी मयत झाले असून  कामगार संघटनेमार्फत त्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख ८८ हजार इतकी मदत कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते देण्यात आली.

कारखान्याच्या नियमानुसार देय असणाऱ्या रक्कमा ही प्रा.फंड, ग्रॅज्युएटी, शिल्लक रजेचा पगार, फॅमिली पेन्शन आदी रक्कमा त्यांच्या वारसांना   देण्यात आल्या आहेत. तसेच कारखान्यामार्फत सभासदांच्या मुलांना  शिष्यवृत्तीचे चेकचे वाटप समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते देण्यात आले.  या शैक्षणिक वर्षात मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषीचे शिक्षण घेणारी जवळपास १२० मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र झाली असून त्यांना वाटप करावयाची रक्कम आठ लाख रुपयांहून अधिक होते.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.