पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार प्रचाराचा धुरळा उडवत आहेत.मतदारसंघात गावोगावी फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. असेच शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे गावोगावी प्रचार करत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये घोड्यावरुन प्रचार केल्यानं ते चर्चेत आले होते. यावेळीदेखील जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील ग्रामस्थांनी घोड्यावरून प्रचारासाठी आलेल्या अमोल कोल्हे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. निमगाव सावा, साकोरी त्यांनतर पारगाव तर्फे आळे या गावांना अमोल कोल्हे यांनी भेटी दिल्या. यावेळी पारगाव तर्फे आळेच्या ग्रामस्थांनी अमोल कोल्हे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली.

यावेळी अमोल कोल्हे यांनी मी जर घोड्यावर बसलो की काही जणांच्या पोटात लय दुखतंय?, असा टोला विरोधकांना  लगावला. यावेळी अमोल कोल्हे यांच्या सोबत शिवसेना नेते माऊली खंडागळे, भास्कर गाडगे यांना देखील ग्रामस्थांनी गोड्यावर बसवत मिरवणूक काढली.

कोल्हेंनी दिलेला शब्द पूर्ण केला –  

2019 साली लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आश्वासन दिले होते की, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार आणि तो शब्द अमोल कोल्हे यांनी पूर्ण केला. फेब्रुवारी 2022 मध्ये खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील मानाच्या यात्रेत बैलगाडा घाटात बैलगाड्यासमोर घोडी धरली होती त्यानंतर आज पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे गावात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.