सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. कॉंग्रेस नेते विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढलेल्या असताना आता वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सांगलीत विशाल पाटलांचे बळ वाढले आहे.

काही दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता वंचितने विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सांगली लोकसभेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता. आता तो निर्णय बदलत विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, सांगली लोकसभेत विशाल पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षामध्येच मोठी नाराजी पसरली होती. आमदार विश्वजित कदम यांनी या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींसमोरच मनातील खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र विश्वजित कदम यांनी आघाडीधर्म पाळत चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.