मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बारामती माढा लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर आता शिरूर मध्येही हाच पेच निर्माण झाला आहे. शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाले आहे. शिरुर लोकसभेत मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.

अशातच, आता अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. बारामतीप्रमाणेच आता शिरुर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्हं मिळालं आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांचं टेन्शन वाढलं आहे. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट या वाद्याचा उल्लेख तुतारी असा केला आहे. ट्रॅम्पेट हे ब्रिटीश वाद्य असून ब्रँड वादनात त्याचा समावेश होते. मात्र, या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असं करण्यात आलं आहे.

शिरुर लोकसभेत तुतारी हे चिन्ह अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांना मिळालं आहे. वाद्य वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगाने दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात तुतारी या शब्दाचं साम्य ठेवलेलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चिन्ह पाहून मतदान करणाऱ्यांमध्ये याचा संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, तुतारी चिन्हांवरून जो काही संभ्रम होत आहे, याचा फटका अमोल कोल्हेंना बसणार का हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईलच.