मॉस्को (वृत्तसंस्था ) युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत – रशिया यांच्यातील मैत्री आणखी घट्ट होणार आहे. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापाराचा नवा मार्ग तयार झाला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात भारताचे चेन्नई बंदर आणि रशियाचे व्लादिवोस्तोक बंदर यांच्यात प्रथमच जहाजांची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी झाली.

हा सागरी मार्ग सोव्हिएत युनियनच्या काळात वापरात होता पण नंतर तो बंद करण्यात आला. या चाचणीदरम्यान, चेन्नई ते व्लादिवोस्तोकपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 17 दिवस लागले. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या ईस्टर्न मेरीटाइम कॉरिडॉरमुळे भविष्यात व्यापाराचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो.

भारतातील रशियाचे महावाणिज्य दूत ओलेग एन अवदेव यांच्या मते, चेन्नई आणि व्लादिवोस्तोक दरम्यान एका जहाजाची चाचणी घेण्यात आली. दोन्ही देशांना सोव्हिएत युनियनच्या काळात जो मार्ग प्रचलित होता तो पुन्हा सुरू करायचा आहे.

ओलेग म्हणाले की, या जहाजाला रशियाला जाण्यासाठी केवळ 17 दिवस लागले. आतापर्यंत भारताला रशियाला जाण्यासाठी 35 ते 40 दिवस लागायचे. भारतातील बंदरे आणि रशियातील सेंट पीटर्सबर्ग यांच्यात व्यापार होतो. या कालावधीत, जहाजे सुएझ कालव्यातून जातात ज्यासाठी 35 ते 40 दिवस लागतात.


चेन्नई ते व्लादिवोस्तोक हे अंतर 5600 नॉटिकल मैल आहे आणि एक सामान्य कंटेनर जहाज ते फक्त 10 ते 12 दिवसात पार करू शकते. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर कोळसा, कच्चे तेल, एलएनजी आणि खतांचा व्यापार होईल. तसेच रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, भारताने त्यांच्या सुदूर पूर्व प्रदेशात गुंतवणूक वाढवावी अशी त्यांची इच्छा आहे. किंबहुना, आता या क्षेत्रात चीनच्या हालचाली वेगाने वाढत आहेत.