मुंबई – सध्या लोकसभेचं रणांगण सुरु आहे. या लोकसभेत सर्वाधिक लक्ष ज्या मतदार संघाकडे लागून राहिले आहे. ते म्हणजे बारामती मतदार संघ. कारण या मतदार संघासाठी दोन बड्या नेत्यांची लढत पाहायला मिळत आहे. बारामती मतदार संघ मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे जीवाची रान करत आहेत. बारामती मतदार संघातून महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याना उमेदवारी मिळाली. अशातच अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एक संधी सोडत नाहीत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर भावनिक आरोप केले आहेत. मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही ; हा कोणता न्याय ? असा सवाल देखील अजित पवार यांनी केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार..?

अजित पवार म्हणाले, मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलला गेलो. आम्ही दिवसरात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला असे अजित पवार म्हणाले. शरद पवार आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु प्रत्येकाचा काल असतो. कुठंतरी 80 वर्षांच्या पुढं गेल्यानंतर थांबलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. मी पण आता 60 वर्षांच्या पुढे गेलो, आता किती दिवसं थांबायचं ? आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. आम्ही काही चुकीचं वागतो का ? त्यामुळे भावनिक होऊ नका, असे ते म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, मी कामाचा माणूस आहे, मी एखादी गोष्ट मनावर घेतली की मी ती करतोच. बारामती कशा पद्धतीने बदलली ते एकदा येऊन बघा. अनेक लोकं आम्हाला सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही आपल्या मतदारसंघात बारामतीसारखा विकास करू. म्हणजे आम्ही कायतरी केलंय ना? की तिथं गोट्या खेळलो का? कामच केलंय ना? याचा विचार कुठेतरी करणार की नाही , अशा शब्दात अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.