पन्हाळा (प्रतिनिधी ) – पन्हाळ्यातील सावर्डे तर्फे असंडोली येथील दलित वस्तीच्या मुख्य वहिवाटी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून , येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना येथील रस्त्यामुळे अनेक अडी – अडचणीना सामोरे जावे लागत आहे. काल रात्री या रस्त्यावरून एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह 10 फूट खाली गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.   दलित वस्तीच्या मुख्य वहिवाटीच्या या रस्त्यावर शेजारील व दोन्ही बाजुकडील मिळकत धारकांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याचे आस्तित्व संपुष्टात येत आहे. या रस्त्याने मोटर सायकलही चालवणे अवघड झाले असून आजपर्यंत अनेक अपघात या ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वस्तीत मयत झालेल्या व्यक्तींना या रस्त्यावरुन आणताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  यापूर्वी दलित समाजाची ही अडचण दूर करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते . तरीही प्रशासनाचे अद्याप या रस्त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे येथील नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत . लवकरात लवकर दलित वस्तीच्या या मुख्य वहिवाटीच्या रस्त्याचे कामकाज पूर्ण करावे अशी मागणी येथील रहिवांश्यांकडून होत आहे.