म्हाकवे : भारतीय संविधानामुळे सर्वंच नागरिकांना एकसमान पातळीवर आणून ठेवले आहे. विरोधक माञ नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास भारतीय संविधान बदलले जाईल, असा कांगावा करत आहेत. भारतीय संविधान चंद्र-सूर्य असेपर्यत कोणीही बदलू शकत नाही, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. विरोधकांकडे सांगण्यासारखे कामच नसल्यामुळे ते नुसते आरोप करत सुटले असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.म्हाकवे ता. कागल येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच कविता दयानंद पाटील होत्या.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर लोकसभेचा राजा कोण होणार? राणीच्या पोटातून जन्म घेतलेला की जनतेच्या मतपेटीतून आलेला, याचा फैसला लवकरच होणार आहे. जिल्ह्यातील लोकहिताला प्राधान्य दिलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्या वारसाला लोकसभेत पाठवून त्यांचा पांग फेडूया. जिल्हयातील लोकांचा प्रतिसाद पाहता संजय मंडलिकांचा विजय आता कोणतीही शक्ती रोखू शकत नाही.

लोकसभेच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू असताना युतीकडून माझ्यासह समरजितसिंह घाटगे, पालकमंत्री हसन मुश्रीफ तर आघाडीकडून संजयबाबा घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. हा कागलचा गौरवच आहे. यामध्ये युतीतून माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे कागलचा सुपुत्र म्हणून मला मताधिक्य द्या, असे आवाहनही मंडलिक यांनी केले.

निवडणूक दिल्लीची की गल्लीची ?
खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, दिल्लीची ही निवडणूक विरोधकांनी गल्लीत आणून ठेवली आहे. नाहक निंदानालस्ती, व्यक्तिगत बदनामी हाच विरोधकांचा अजेंडा आहे. आम्ही त्यांना तुमची भूमिका मांडा म्हणतो तर प्रत्येक गोष्टीला विरोधी उमेदवाराचे प्रवक्तेच उत्तरे देतात.

प्रा.बी.डी.चौगुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सदासाखरचे संचालक बंडोपंत चौगुले, माजी उपसरपंच रमेश पाटील, धनाजी पाटील, सरपंच कविता पाटील, उपसरपंच रणजीत लोहार, ए टी पाटील, एकनाथ पाटील, आनुरचे बाळासाहेब चौगुले, उमेश पाटील, आप्पासाहेब भांदिगरे, दत्तात्रय आरडे, गोरंबेचे शहाजी पाटील, जयसिंग पाटील, शिवाजी पाटील, धनंजय महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष रामदास गुरव, हिंदुराव पाटील, सौ. वर्षा पाटील यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.