कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर म्हणजे निसर्ग संपन्न असणारे ठिकाण. श्री अंबाबाई मंदिर, जोतीबा मंदिर, किल्ले पन्हाळा अशा विविध धार्मिक आणि ऐतिहासीक स्थळांची नगरी म्हणजे कोल्हापूर होय. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाला या शहराच्या वातावरणाची, निसर्ग संपदेची भुरळ पडली जाते.

एखाद्या शहराच्या प्रवेशद्वारावरून त्या शहराचे वर्णन बाहेरगावाहून येणारे पर्यटक करत असतात. प्रवेशद्वार म्हणजे शहराचे नाकच म्हणावे लागेल. परंतु कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार (तावडे हॉटेल) गेली अनेक महिने समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, गवत, रस्त्याला पडलेल्या भेगा, सिमेंट रस्ता खुदाई करून त्याजागी डांबरीकरण केल्याने पडलेले खड्डे, तावडे हॉटेल परिसरात झालेले अतिक्रमण, शोभेच्या वस्तू विकणा-यांचे अनेक स्टॉल, पुणे-बेंगलोर हायवेमुळे वाढती वाहतूक समस्या, प्रवेशद्वार परिसरात होत नसलेली स्वच्छता अशा अनेक बाबींकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

या विषयासाठी आज (सोमवार) भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी आयुक्तांना इमेलद्वारे निवेदन सादर केले. तसेच आयुक्त या नात्याने आपण याविषयात तत्परता दाखवून कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार (तावडे हॉटेल) परिसराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून शहराचे हे प्रवेशद्वार या समस्येतून मुक्त करावे, अशी मागणी केली.