कुरूंदवाड (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरणार असून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केल्यास अधिकाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. ते आंबा (ता. शाहूवाडी) येथील अभ्यास शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, हातकणंगले लोकसभेची निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणार आहे. गतवेळच्या चुका लक्षात घेऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीस नव्या दमाने सामोरे जाणार आहे. वीज वितरण कंपनीला शेतकरी काही देणे लागत नाही. शेतीपंपाची बिले दुरूस्त करून दिल्याशिवाय शेतकरी वीज बिले भरणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केली आहेत. ती त्वरीत सुरू करावीत.

इंद्रजीत देशमुख म्हणाले की, कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी अधिक कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतीचे प्रश्न अधिक जटील होत असून ते प्रश्न सुटण्यासाठी युवकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना लढणारी आहे. आमची ताकद निश्चितच दाखवून देऊ.  यावेळी सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, पोपट मोरे, शमशुद्दीन पाटील, संदीप कारंडे, वसंत पाटील आदी उपस्थित होते.