नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी समलैंगिक व्यक्तीच्या नियुक्तीसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे देशात प्रथमच समलैंगिक व्यक्तीचा न्यायाधीश पदावर नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समलैंगिक असलेले ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांनी अनेक वर्ष दिलेल्या लढ्याला यश आले आहे. 

ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय २०१८ पासून अनेकदा लांबणीवर पडलेला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अखेर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याआधी ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे कॉलेजियमने म्हटले आहे. कृपाल समलैंगिक असून त्यांच्या निवडीमुळे समलिंगी हक्कांसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. कृपाल हे समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणाऱ्या महत्वपूर्ण खटल्यातील दोन याचिकाकर्त्यांचे वकील होते.