पुणे (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा  शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.  संजय राऊत जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख आहेत. इतक्या वर्षानंतर या जगामध्ये राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झालेले नाही.  त्यांच्याकडे तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा खोचक शब्दांत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

पुण्यातील बोपोडी येथे बोलताना पाटील म्हणाले की, भाजपवर टीका करणे, ही आपली ड्युटी संजय राऊत योग्यपणे पार पडत आहेत. मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही,  त्यांना लगेच टोचतं. तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केले आहे. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेने मान्य केले आहे. अनेक गावात कन्नड भाषिक अधिक आहेत. ती गावं स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये गेली आहेत. अशी ८०० गावं आहेत. त्यामुळे बेळगावसहित ८०० गावं महाराष्ट्रात आली पाहिजेत. ही भाजपची  भूमिका आहे, असेही पाटील म्हणाले.