मुंबई (प्रतिनिधी) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात पुन्हा एकदा सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधीही त्याने पहिल्या हंगामात भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर करून बराच काळ लोटला; मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये मराठमोळ्या तेंडुलकरची अजूनही तेवढीच क्रेझ आहे. सचिन मैदानात दिसताच प्रेक्षक त्याच्या नावाचा जयघोष करतात.

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज येत्या १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतील. सचिन तेंडुलकरसोबतच युवराज सिंगदेखील भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. सचिनने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामातही सहभाग नोंदवला होता. सचिनसोबत नमन ओझा, इरफान पठाण, युसूफ पठाण, राहुल शर्मा आणि इतर खेळाडूदेखील दिसणार आहेत.