मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशी सभेत महायुतीला बिनशर्ती पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या निर्णयाचा राज्यात पडसाद उमटताना पाहायला मिळाला. एकीकडे राज ठाकरे यांच्या या निर्णयावर विरोधकांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला तर दुसराकीडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावत मनसे कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची समझुत काढली. पण या नंतर ही काही मनसे कार्यकर्त्यांची वेगवेगळे सूर उपटत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेच्या एका मोठ्या नेत्याने मनातील भावना बोलून दाखवली आहे. नुकतीच मनसेच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची बैठक पार पडली. सर्व मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.

ते म्हणाले, आम्हाला या आमच्या सगळ्या भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडणार आहोत. आम्ही राज ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत. राज ठाकरे जसं मार्गदर्शन करतील, तशी आम्ही वाटचाल करु” असं वैभव खेडेकर म्हणाले. “मागच्या 20 वर्षात आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यांना जेलमध्ये डांबलं. ज्यांनी नगरसेवक ग्रामपंचायत फोडली, त्यांच्यासोबत कसं काम करायचं? आजची बैठक आक्रमक झाली. साहेबांचा आदेश पाळला जाईल” असं वैभव खेडेकर म्हणाले. मागच्या पाच वर्षात खासदार सुनील तटकरे यांनी कुठलीही विकासकाम केली नाहीत, असा आरोप खेडेकर यांनी केला. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात या कडे मनसैनिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.