सांगली : सांगली लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विशाल पाटील यांनी काल शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वाची आहे असे सांगत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा दिला. यातच विशाल पाटील यांच्या बंडाला विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांनी पाठींबा दिला आहे.

दरम्यान, सांगलीत बंडखोरी करणारे काँग्रेस नेते विशाल पाटील यांना काँग्रेसमधून पाठिंबा मिळू लागलाय. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय. यामुळे महाविकास आघाडीचा सांगलीमधील वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे.

सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ X या सोशल मिडिया प्लॅटफॉमवर पोस्ट करत त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात. काँग्रेसमध्ये युवकांना संधी नाकारल्या जात असल्याचेच या ट्विटच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी अधोरेखित केल्याचे बघायला मिळतेय.
सत्यजित तांबे यांचे ट्विट जशाच तसे –

विशाल दादा… ऑल द बेस्ट
विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे.
वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत.

विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी.

काँग्रेसला उमेदवारी मिळावी
सत्यजित तांबे यांचा पाठिंबा मिळाल्याने विशाल पाटील यांच्या बंडखोरीला ताकद मिळालीय. पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीतील वाद वाढण्याची शक्यता आहे. सांगलीमधील उमेदवारी ही काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी विशाल पाटील यांनी केलीय. काँग्रेस एकसंघ होती, हे कुणाला बघवले नाही. काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन. पण काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवून जावेत, असा उद्देश काही जणांचा आहे, मला अजून ही विश्वास आहे. मला उमेदवारी मिळेल”, असं काँग्रेस नेते विशाल पाटील म्हणालेत.