नागपूर ( प्रतिनिधी ) आज नागपूर येथे ‘लोकप्रतिनिधींची स्वतःच्या मतदार संघाविषयी कर्तव्ये आणि विकास कामांचे नियोजन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या 50 व्या संसदीय अभ्यास वर्गास उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदार संघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी विधानमंडळ सचिव श्री. जितेंद्र भोळे उपस्थित होते.

मतदारसंघातील लोकांच्या गरजा ओळखून व जाणून घेऊन लोकप्रतिनिधींना विकास कामांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून पाटील म्हणाले, विकास कामांसाठी मिळणाऱ्या शासनाच्या निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन त्यांनी करावे. मतदारसंघातील विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून त्या पद्धतीने त्या कामांवर निधी खर्च करावा.

यामुळे जगात सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही अधिकाधिक सक्षम बनत जाईल, अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी  विद्यार्थ्यांनी आपापल्या विद्यापीठात, महाविद्यालयामध्ये मतदान राजदूत म्हणून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.