मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काल राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. राज्यात गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याचा सर्वस्वी दोष ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. जिथे मविआ जिंकण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्रांवर दिरंगाई केल्याचा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी केला. या त्यांच्या आरोपावर आज भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत चोख प्रत्युत्तर दिलंय. पराभव काय असतो याचा चेहरा पाहायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा पाहिल्यानंतर ते जाणवत होतं. ‘ठाकरेंच्याच चेहर्‍यावर काल पराभव दिसत होता’, अशी टीका या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी केली.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, ज्याने कधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही असा संजय राजाराम राऊत आज सकाळी निवडणुकीचं आकलन आणि विश्लेषण करताना दिसला. ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या दिवशी शेंबड्यासारखा रडताना दिसला. 4 जूननंतर पुन्हा एकदा मोदींजीच्याच नेतृत्वातील सरकार येणार हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमुळे आणि आजच्या संजय राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालं आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी गृहगविभागाला पुन्हा एकदा विनंती करेन की, लवकरात लवकर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचं पासपोर्ट जप्त करावं. कारण 4 जूननंतर त्यांचं सरकार नसेल हे सिद्ध झाल्याने ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत आहे. अंगावर असलेले भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप यांमुळे उद्धव ठाकरे लंडनला पळणार आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी यावेळी केला.