कुरुंदवाड (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीला येथील पंचगंगा-कृष्णा घाट रस्त्यावर कृष्णा वेणी यात्रा भरते; मात्र गेल्या चार वर्षांपासून यात्रेसाठी जागा देण्यावरून शेतकरी आणि यात्रा कमिटी यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहे. यात्रा अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही यात्रेबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे यात्रेच्या तोंडावरच यात्रा भरण्यावरुन शेतकरी आणि यात्रा कमिटी यांच्यात वाद निर्माण होण्यापूर्वीच पालिका आणि पोलिस प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे.

शहर बचाव कृती समितीने कृष्णा वेणी यात्रा आहे त्याच ठिकाणी शेतकर्‍यांना विश्वासात आणि पिकांची नुकसानभरपाई देत यात्रेची परंपरा कायम राखावी. यासाठी पालिका मुख्याधिकारी आशीष चौहान यांनी पुढाकार घेऊन हा वाद सामोपचाराने मिटवावा, अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे व बबलू पोवार यांनी केली आहे.

कृष्णा-पंचगंगा संगम घाट रस्त्यावर संस्थान काळापासून कृष्णा वेणी यात्रा भरते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ही सर्वात मोठी यात्रा आहे. कृषी, बैलांचे प्रदर्शन व विक्री यासह खेळणी, मनोरंजनाचे कार्यक्रम असे आठ दिवस यात्रा असते. त्यासाठी या रस्त्यावरील शेतकरी शेतातील पीक रिकामे करुन यात्रेसाठी पन्नास ते साठ एकर जागा खुली करुन देत असतात. वाहनांची वाढती संख्या आणि माणसांच्या धावपळीच्या जीवनामुळे यात्रेची व्याप्ती कमी होत गेली. असे असले तरी येथील कृष्णा वेणी यात्रा शेतकरी, नगरपालिका आणि राजकीय नेत्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९ च्या महापुराने कृष्णा पंचगंगा काठावरील शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्याचा परिणाम कृष्णा वेणी यात्रेवर झाला.

महापुराने शेतीचे नुकसान झाल्याने आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी यात्रेला जागा देण्यास तयार होत नसल्याने यात्रा कमिटी आणि शेतकरी यांच्यात वाद निर्माण झाला. काही शेतकरी यात्र समितीच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने यात्रा समितीला शेतकऱ्यांच्या संमतीविना व शेती पिकांचे नुकसान करुन यात्रा भरवू नये. नगरपालिकेच्या जागेतच यात्रा भरवावी, असा आदेश दिला. गतवर्षी नगरपालेकेच्या जागेत तसेच स्वेच्छेने शेती देणाऱ्या शेतमालकाच्या जागेत यात्रा भरविण्यात आली होती. कृष्णा वेणी यात्रा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे.

नगराध्यक्ष हे यात्रा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष, तर मुख्याधिकारी सचिव असतात. पालिकेत सध्या प्रशासक आहे. त्यामुळे मुख्याधिकारी आशिष चौहान हे प्रशासक असून कृष्णा वेणी यात्रा पारंपारिक पद्धतीने भरविण्यासाठी शेतकरी, शहरातील प्रमुख मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस यांची समन्वयक बैठक घेऊन यावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

शहरवासीयांची श्रद्धा आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून प्रसंगी पिकांची नुकसानभरपाई देऊन यात्रेची परंपरा कायम ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे. यावेळी विलास उगळे, सिकंदर सारवान, अर्शद बागवान, भरत घोरपडे, शैलेश व्होरा उपस्थित होते.