बीड : निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सुरेश नवले यांनी  काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता.आता त्यांनी बीडमधून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवीत असलेल्या बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.सुरेश नवले हे माजी मंत्री असून त्यांची बीडमध्ये मोठी ताकत आहे.त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली असून महायुतीला याठिकाणी मोठा झटका बसला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपने  पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. बजरंग सोनावणे हे मराठा उमेदवार असल्याने बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. अशातच सुरेश नवले यांनी सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आगामी काळात बीडमधून विधानसभेची निवडणूक देखील लढवणार असल्याचं सुरेश नवले यांनी जाहीर केलं आहे.एका कार्यकर्ता मेळाव्यात नवले यांनी ही घोषणा केली आहे. परंतु , कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी अध्याप स्पष्ट केलेलं नाही. “सध्या सत्ता मिळाल्याने मुख्यमंत्र्यांकडे अनेक लाभार्थ्यांची गर्दी होत आहे, मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काहीच काम होताना दिसत नाही. त्यामुळे अनेकजण नाराज असून शिवसेनेतून बाहेर पडत आहेत”, असं धक्कादायक विधानही नवले यांनी केलंय.