मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवन्ना यांनी त्यांच्या मोबाइल फोनमधून शेकडो सेक्स व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी कर्नाटकात जाऊन बलात्कार करणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागत आहेत, असं हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा ढोंग करणार पक्ष आहे. कर्नाटकात एका व्यक्तीचे 2800 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तो व्यक्ती भाजपा परिवारातील सदस्य आहे. मोदींचा हा एवढा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयातील सदस्याने 2800 बलात्कार केले आणि मोदी त्यांच्यासाठी मते मागतात. असे घृणास्पद कृत्य जर कोणी करू शकत असेल तर ते केवळ एक अतृप्त भटकणारा आत्माच करू शकतो आणि मोदी ते काम करत आहेत. मोदी जाऊन बलात्कार करणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागत आहेत. याबद्दल मोदींच्या मनात कोणतीही खंत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

काय प्रकरण आहे?
दरम्यान, अलीकडेच प्रज्वल रेवन्ना यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर त्याच्या घरात काम करणाऱ्या नोकराने प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणप्रकरणी एफआयआर दाखल केली. नोकराने प्रज्वल रेवन्नाची पत्नी भवानी हिचा नातेवाईक असल्याचा दावा केला आहे. त्याने होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, प्रज्वल रेवन्ना घरात काम करणाऱ्या महिलांना आपल्या खोलीत बोलावत असे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.