कोल्हापुरी ठसका…

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : अलीकडे देशाच्या, राज्याचा आणि जिल्ह्याच्याही राजकारणात फार मोठे बदल झाले आहेत. बदल अपरिहार्य असतो; मात्र तो सकारात्मक असेल, तर स्वीकाराहार्य असतो; पण नकारात्मक असेल, तर त्याचा निषेध होतो. जिल्ह्याच्या राजकारणात बदल निश्चितच झाला. राजकारण बदलले आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात ‘महाभारत’ घडणार असं बोललं जातं आहे. सध्या जे घडते आहे. ते लक्षात घेता महाभारत नव्हे, तर राजकारणाचा खेळ खंडोबा होणार आहे.

राजकारण्यांच्या महाभारतामुळे कुणाचे कल्याण होणार नाही. मुख्य महाभारत संपत्तीसाठी झाले. इथे ते सत्तेच्या सारीपाटासाठी होणार आहे. या महाभारतातून जो लाभ किंवा हानी होईल, त्याचे लाभार्थी राजकारणीच असणार हे निश्चित. त्याचा दुष्परिणाम मात्र सर्वसामान्य जनतेवर होणार आहे, हे कुणी लक्षातच घ्यायला तयार नाही.

राजकारणात कुटुंबातील, मैत्रीतील वाद कधी चव्हाट्यावर आणायचा नसतो. हा जिल्हा त्याला आत्तापर्यंत अपवाद ठरला आहे. महाभारत कुणाचे आणि भोगतोय कोण, अशी अवस्था झाली आहे.

सर्व सामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला राजकारण्यांकडे वेळ नाही. जिल्ह्यात अनेक प्रश्न वर्षोनुवर्षे प्रलंबित आहेत. या प्रश्नांची यादी खूप मोठी आहे. त्याची वेळोवेळी उजळणी करून लेखण्याही झिजल्या.  या शिवाय रोज अस्मानी आणि सुलतानी संकट येत आहेत. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार यामुळे जनता घायकुतीला आली आहे. रोजच जगणं कसं जगायचं याची भ्रांत त्यांना पडली आहे.

महाराष्ट्रातील वा जिल्ह्यातील राजकारण असो, आजच्या इतकं किळसवाणं राजकारण यापूर्वी कधीच पाहायला मिळालं नाही, अशी ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

राजकारण इतकं कसं भरकटत गेलं हेही समजेनासे झाले आहे. राजकारण लयाला गेलं, याला मतदारही तितकेच जबाबदार आहेत, हे नाकारता येणार नाही. तरीही कंबरेच सोडून डोक्याला बांधण्यात कुणालाच काही गैर वाटेनासं झालं आहे. मूळ महाभारातून काय निष्पन्न झाले. त्याचाही कुणी विचार करताना दिसत नाही. राजकारण्यांना केवळ सत्ता हवी आहे. जिल्हा आमच्या ताब्यात असायला हवा. आम्ही जनतेला काय हवं, यापेक्षा आम्हाला काय हवं ते घडवू. त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. यासाठीच नेत्यांचा अट्टाहास सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नेते आपापली भूमिका मांडत आहेत.

पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच राजकारण्यांचे सूत्र आहे. ६५ टक्के लोक फक्त सुशिक्षित आहेत; मात्र राजकारणाच्या बाबतीत अजूनही काही जनता ‘अडाणी’च आहेत. त्यांच्यात जागृती व्हायला हवी. घराणेशाहीचा परंपरा जोपासायला मतदारच जबाबदार आहेत. महापालिका, जिल्हा परिषदसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाभारत घडू नये, एवढीच माफक इच्छा आहे.

राजकारणात काहीजण अपवाद आहेत, असं म्हणतात; पण आमच्या मते अपवाद कोणीच नाही. कारण अशा लोकांच्या सहवासात ते असतात. त्यांचे ते सहकारी आहेत. अशांची संगत करणारे, त्यांचे नेतृत्व करणारेही दोषी आहेत.

त्यामुळे सगळेच एकाच माळेचे मणी आहेत. महाभारत घडायचं तेव्हा घडू दे, तोपर्यंत सर्व सामान्य जनता सुखी समाधानी राहू दे. राजकारण्यांना सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना लवकरच आगमन होणाऱ्या गणपती बाप्पाकडे करूया.

 

ठसकेबाज