बेळगाव ( वृत्तसंस्था ) बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल पोर्टल आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून संपादक प्रकाश बेळगोजी यांनी पत्रकारिता क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली आहे. प्रकाश बेळगोजी यांच्या पत्रकारितेची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आपल्या सक्षम लेखणीच्या माध्यमातून सीमावर्ती भागात मराठी अस्मितेचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रकाश बेळगोजी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्नशील असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमाभागात सुरु असलेली असलेली निर्भिड पत्रकारिता स्फूर्तिदायी असून त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. 16 मार्च 2024 रोजी चिंचवड येथील आहेर गार्डन (ए. सी. बैंक्वेट हॉल, चिंचवड) येथे पार पडणार आहे. या वेळी एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. या प्रसंगी माजी केंद्रीय वित्तराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

शनिवार, दि. 16 मार्च 2024 रोजी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे एकदिवसीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत त्यावेळी अमृत काळातील माध्यम स्वातंत्र्य भविष्य आणि पत्रकारितेतील राम या विषयावर लोकमत डिजिटलचे संपादक आशिष जाधव,लोकमत डिजिटलचे संपादक संजय आवटे, टाइम्स ना मराठीचे संपादक मंदार फणसे,जेष्ठ संपादक महेश म्हात्रे, सकाळचे संपादक सम्राट फडणवीस जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा परिसंवाद आयोजन करण्यात आले आहे.