इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी-टाकवडे रस्त्यावरील एका मोठ्या स्पिडब्रेकरवरुन रिक्षा पलटली. याच्या खाली सापडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. अक्षय अनिल शिंदे (वय 24, रा. अथणी, जि. बेळगाव) असे मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर या अपघातात ६५ वर्षीय पादचारी रावसाहेब नेजे जखमी झालेत. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे हा आपली रिक्षा घेऊन नातेवाईकांना सोडण्यासाठी इचलकरंजीत आला होता. तो त्यांना सोडून रात्री तो टाकवडेमार्गे अथणीकडं परत जात होता. टाकवडे रोडवरील रामपुष्प लॉन परिसरात असलेल्या मोठ्या स्पिडब्रेकरचा अंदाज न आल्यानं त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला असता त्याची रिक्षा उलटली. आणि त्याच्या खाली अक्षय सापडला. त्याचवेळी रस्त्यावरून निघालेल्या रावसाहेब नेजे यांनाही रिक्षाचा धक्का लागल्यानं ते जखमी झाले.

या अपघातात गंभीर जखमी झाल्यानं अक्षयला नागरिकांनी तातडीनं इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.