मुंबई – सध्या लोकसभेचं रणांगण सुरु आहे. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान अनेक गौफ्यस्फोट होत आहेत अनेक खुलासे होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी माजी कृषिमंत्री आणि शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांसोबत विलीन होणार अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार असं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणाले होते. यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. बालबुद्धीने काही लोक बोलत असतात. त्याकडे काय लक्ष द्यायचं? असे ते म्हणाले आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

काय म्हणाले शरद पवार..?

शरद पवार म्हणाले राजकारणात बालबुद्धी हे ज्यांचे वैशिष्ट्ये आहे असे अनेक लोक असतात. बालबुद्धीने काही लोक बोलत असतात. त्याकडे काय लक्ष द्यायचं? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. अजितदादांनी अशोक पवार यांच्यावरही टीका केली होती. तुम्ही आमदार कसे होता पाहतोच, असं अजित पवार म्हणाले होते. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले. मी काही ते विधान ऐकलं नाही. पण मंत्री म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने काही पथ्य पाळायला हवीत. तुम्ही म्हणता तशी भाषा असेल तर ती त्या चौकटीत बसणारी नाही. लोक याबाबत निर्णय घेतील, असं शरद पवार म्हणाले. आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.