कोल्हापूर (प्रतिनिधी) : पहिले ‘हिंदकेसरी’ श्रीपती खंचनाळे यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी ठाणे येथील डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फ़े आज १ लाखाचे आर्थिक साहाय्य देण्यात आले. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते आज (मंगळवार) ही मदत खंचनाळे यांचे चिरंजीवांकडे सुपूर्द करण्यात आली.

हिंदकेसरी श्री. खंचनाळे यांची प्रकृतीबाबतचे वृत्त समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा सूचना दिल्या होत्या. तसेच उपचारामध्ये विशेष लक्ष देण्यात यावे, यासाठी डायमंड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. साईप्रसाद यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संवाद साधला होता. त्यानुसार फौंडेशनच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. या वेळी उपरोक्त सर्वांनी अतिदक्षता विभागात श्रीपती खंचनाळे यांना भेटून तब्येतीची विचारपूस केली. यड्रावकर यांनी खंचनाळे यांच्या उपचारासाठी शासनामार्फतही आवश्यक सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली.