कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका कारवाईमध्ये एका व्यक्तीला सहआरोपी न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेतली होती. तर फरारी झालेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत शिवाजी गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र पोवार या दोघांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (सोमवार) रात्री अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राजारामपुरी पोलीसांनी एका मटका अड्ड्यावर छापा टाकला होता. या कारवाईमध्ये एका व्यक्तीला सहआरोपी न करण्यासाठी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, कॉन्स्टेबल रोहित पोवार व त्यांचा खासगी पंटर रोहित सोरप यांनी एका व्यक्तीकडे ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपये त्यांनी घेतले होते. राहिलेल्या ४० हजारांसाठी त्यांनी त्या व्यक्तीकडे तगादा लावला होता. याची तक्रार त्या व्यक्तीने कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यानुसार या विभागाने सापळा रचून १९ सप्टेंबर रोजी पोलीसांचा खासगी पंटर रोहित सोरप याला ४० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. मात्र, उपनिरीक्षक अभिजित गुरव आणि कॉन्स्टेबल रोहित पोवार हे दोघे फरारी झाले होते. त्यांना आज रात्री अटक करण्यात आली.