मुंबई (प्रतिनिधी) : रविवार १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यात आज (गुरुवार) विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. विरोधी पक्षांसह सरकारमधील घटक पक्षांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेतली. त्यानंतर आज रात्री ८.३० च्या सुमारास राज्यातील जनतेला फेसबुकवरून संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांत एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल. उद्या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात येईल, परीक्षार्थींनी आपली तयारी सुरुच ठेवावी. वयाची मर्यादा आडवी येणार नाही, असे सांगत १४ मार्च रोजी मात्र परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट केले.