सातारा/प्रतिनिधी : कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरेखुरे वारसदार नाहीत तर ते दत्तक आहेत असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मांडलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कोल्हापूरसह शाहू प्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. इतिहास संशोधकांनी सुद्धा संजय मंडलिक यांना केलेल्या वक्तव्यावरून धारेवर धरत विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यातच आता अभिनेता किरण माने यांनी सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलेलं आहे. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त करताना कोल्हापूर आणि सातारा महाराष्ट्रातील काळजाचा विषय असल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरेखुरे वारसदार नाहीत तर ते दत्तक आहेत अशी टीका शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंडलिक यांच्या या विधानानंतर मराठी अभिनेते आणि सध्या ठाकरे गटात असलेल्या किरण माने यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी सुद्धा भाष्य केलं आहे. छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली असं किरण माने यांनी म्हंटल आहे.

किरण मानेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी :
कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी. परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला ! ही खुप खुप खुप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही.

मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय… ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली… ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं… त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिले… त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का??? यांचे ‘बोलविते धनी’ वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका.

कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे.
जय शिवराय… जय भीम !