नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट होताच शिवसेना  शिंदे गटाचे  नेते हेमंत गोडसे  यांनी त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. आज राम नवमी.रामनवमीनिमित्त हे दोन्ही नेते नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला आले होते. महायुतीत असलेले हे दोन्ही नेते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तरीही या दोघांची भेट होऊन गोडसेंनी भुजबळांचे आशिर्वाद घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीचा नाशिक मतदारसंघाचा तिढा अजूनही  सुटलेला नाही, त्यामुळे नाशिकमधून तिकीट नेमकं कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

यावेळी हेमंत गोडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात, त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. हे आशीर्वाद नक्की कशासाठी घेतले, ते प्रभू रामचंद्रांना माहिती, असं गोडसेंनी म्हटलं आहे. आपल्याला उमेदवारीची संधी लवकर प्राप्त होवो आणि विजय पण मिळो ही आज काळारामाकडे प्रार्थना केल्याचंही हेमंत गोडसेंनी सांगितलं आहे. 

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, ठाणे लोकसभेची जागा ही भाजपने मागितली आहे. लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबाव तंत्राचं राजकारण केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.