कोल्हापूर : प्रतिनिधी : आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस वाढत असल्याचे चित्र आहे. अशातच कोल्हापुरात दोन्ही लोकसभच्या जागेचा तिढा कायम आहे. लोकसभेला कोणाला मैदानात उतरवायचं याची भाजप चाचपणी करत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे महायुतीसमोर तगडे आव्हान असणार आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे मोठे आव्हान असणार आहे. शिंदेंच्या दोन्ही खासदारांवर असणारी नाराजी यामुळे भाजप या दोन्ही जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी दबाव तंत्राचा वापर करत आहे. भाजपने तसे पर्यायी उमेदवारही निश्चित केले आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांची घालमेल वाढली आहे. मात्र संजय मांडलिक  आणि धैर्यशील माने हेच उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र भाजपच्या सर्व्हेमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मांडलिक  आणि  हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर लोकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे शिंदे यांना सांगत दोन्ही ठिकाणी उमेदवार बदलण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. यापैकी एका जागेवर भाजपकडून दावा केला होता. पण आता भाजपकडून दोन्ही जागांवर दावा सांगितला जात आहे. आहे. तसेच दोन्ही ठिकाणी पर्यायी उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेशही भाजपकडून देण्यात आले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरच्या दोन्ही जागांसाठी आग्रही असून खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.   

कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे तर हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी शौमिका महाडिक, संजय पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांचाही पत्ता राखून ठेवला आहे. दरम्यान, शेवट क्षणी कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी भाजपकडून आग्रह सुरू आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांविरोध वातावरण आहे असं भाजपकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता भाजपकडून या दोन्ही उमेदवारांना बदलण्यासाठी शिंदेंवरती दबाव टाकला जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये सातत्याने दौरे करत या दोन्ही मतदारसंघांवरील दावा कायम केला आहे. तीन दिवसात दोनवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौरा केला. मात्र, भाजपकडून वाढत चाललेला दबाव यामुळे ते दोन्ही उमेदवार बदलणार का? याकडे लक्ष असेल. 

धैर्यशील मानेंवर नाराजी…

शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत. पण त्यांच्या बाबतीतही लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे भाजप ही जागा आपल्याला मिळावी यासाठी आग्रही आहे. भाजपकडून शिंदेंवर तसा दबावही आणत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात धैर्यशील माने यांच्या समोर राजू शेट्टी यांचे तगडे आव्हान असणार आहे. मतदार संघात शेट्टी यांच्या बाजूने वातावरण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, भाजप हातकणंगलेतून विनय कोरे यांना मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, विनय कोरे यांनी याला नकार दिला आहे.

विनय कोरेंनी लोकसभा उमेदवारीवर टाकला पडदा

हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचा अहवाल भाजपचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा उमेदवार बदलाच्या हालचाली आहेत. त्या ठिकाणी जर विनय कोरे यांना उतरवलं तर ते राजू शेट्टी यांच्या विरोधात जिंकू शकतात असं भाजपच्या अहवालात आहे.  त्यानतंर विनय कोरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. आता मात्र कोरे यांनी लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून केली जाणार नाही, असे म्हणत चर्चेवर पडदा टाकला आहे. 

 हातकणंगलेवर भाजपचा दावा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारी महायुतीकडून  करण्यात येत आहे. 

भाजपने कोल्हापूर किंवा हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यानंतर भाजपने काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. त्या बदल्यात भाजपने आता हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.

हातकणंगलेसाठी संजय पाटील-यड्रावकर?

कोल्हापुरात सध्या लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. पण भाजपच्या सर्वेत दोन्ही उमेदवारांवर मतदारांची नाराजी असल्याची माहिती आहे. त्यामुळे पराभव टाळण्यासाठी भाजप दोन्ही जागेवर उमेदवार बदल्यांच्या तयारीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या हातकणंगलेसाठी संजय पाटील-यड्रावकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांना थांबवून संजय पाटील यांना उमेदवारी देण्याची तयरी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोल्हापूर, हातकणंगलेत मांडलिक, मानेंचे पारडे जड

भाजपने कोल्हापूर किंवा हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र विद्यमान दोन्ही खासदारांचे पारडे जड आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्व. सदाशिव मांडलिक यांना गावा गावात मानणारा वर्ग असून तो वर्ग मांडलिक घराण्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे मांडलिकांचा जो मतदार आहे तो मांडलिक यांच्या सोबत असेल. तर हातकणंगले मतदारसंघात स्व. बाळासाहेब माने यांच्यानंतर निवेदिता माने या खासदार झाल्या. त्यांनी हातकणंगले मतदार संघावर माने गटाचे वर्चस्व कायम ठेवले. यांच्यानंतर धैर्यशील माने यांनी २०१९ च्या निवडणुकीत विजय संपादन करून माने गटाला नवसंजीवनी मिळवून दिली होती. यामुळे सध्यातरी दोनही मतदार संघात मांडलिक आणि माने यांचे पारडे जड असून मांडलिक आणि माने हेच उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.