गाझियाबाद : लोकसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तप्त चालले आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता मिळवायची यासाठी चंग बांधला आहे. यावेळी 400 चा एकदा पार करणार असे भाजप छातीठोकपणे सांगत आहे. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपला मिळणाऱ्या जागांच्या संख्येबाबत मोठे भाकीत केले आहे. आज राहुल गांधी यांनी दावा केला की, यावेळी भाजपला केवळ 150 जागा मिळतील.

राहुल गांधी यांनी गाझियाबादमध्ये अखिलेश यादव यांच्यासमवेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, संपूर्ण देशात प्रचंड अंडरकरंट आहे. “मी जागांचा अंदाज लावत नाही. 15-20 दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की, भाजप 180 जागा जिंकेल, पण आता मला वाटते की त्यांना 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की आम्ही कामगिरी सुधारत आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आमची आघाडी खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू.”

संविधान बदलण्याचा घाट
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे आरएसएस आणि भाजप संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत 2-3 मोठे मुद्दे असतात. बेरोजगारी आणि महागाई ही सर्वात मोठी समस्या आहे, पण भाजप लक्ष वळवण्यात व्यग्र आहे, या प्रश्नांवर ना पंतप्रधान बोलतात ना भाजप बोलते.

तरुणांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ‘गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी लागू करून आणि अदानींसारख्या मोठ्या अब्जाधीशांना पाठिंबा देऊन रोजगार निर्मितीची व्यवस्था कमी केली आहे. पहिले काम म्हणजे पुन्हा एकदा रोजगार बळकट करणे, यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात 23 कल्पना दिल्या आहेत, एक कल्पना क्रांतिकारी आहे शिकाऊ उमेदवारीचा अधिकार. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही उत्तर प्रदेशातील सर्व पदवीधर आणि पदविकाधारकांना शिकाऊ प्रशिक्षणाचा अधिकार देऊ. प्रशिक्षण असेल आणि आम्ही तरुणांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करू आणि आम्ही हे हक्क करोडो तरुणांना देत आहोत, पेपरफुटीसाठीही कायदा करू.