कुरुंदवाड प्रतिनिधी :- हेरवाड – पाचवा मैल मार्गालगत असणाऱ्या हॉटेल पनुजा जवळ दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, हा अपघात इतका भिषण होता की दोन वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. जखमींना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचवा मैलहून कुणकेश्वर देवाचे दर्शन घेवून प्रवासी वाहतूक गाडी येत असताना समोरून येणाऱ्या बलेरो पिकअप या गाडीमध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेत सात जण गंभीर जखमी झाले. यावेळी पहाटे स्वाभिमानीचे बंडू पाटील शेताकडे जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला बोलावून घेतले . पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहेत