शिरोळ (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील शेतकरी पंडित पाटील यांची हाळभाग येथे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये पाटील यांनी २२ जुलै २०२२ मध्ये ०२६५ फाउंडेशन या उसाची लागवड केली होती. या ऊसाला लागण, बाळ भरणी, वेळी, भरणी, सेंद्रिय व रासायनिक खतांची वेळोवेळी लागवड दिली. तशीच योग्य मशागत केल्याने सद्या ५० कांडी ऊस तयार झाली आहे.

याची ऊस तोड करून साखर कारखान्यामध्ये पाठवण्यात आले असता या उसाचे विक्रमी ८३ टन वजन भरले. यातून त्यांना एकूण २ लाख ६१ हजारांचे उत्पन्न मिळाले. तर नांगरणी,मशागत, रासायनिक व शेणखते,बी बियाणे,फवारणी, भरणी असा एकूण ८० हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च वजा करता या ऊस उत्पादनातून पाटील यांना १ लाख ८१ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. शेतीमध्ये आधुनिक वेगवेगळे प्रयोग, हवामान पाणी व योग्य नियोजनामुळे ५० कांडी ऊस तयार करून विक्रमी उत्पादन घेतले.

शेती परवडत नाही अशा युवा शेतकऱ्यासमोर पंडित पाटील यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यासह कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाटील यांचे अभिनंदन केले आहे.