मुंबई : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. नसीम खान यांनी शुक्रवारी (ता. 26 एप्रिल) स्टार प्रचारकाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची ही नाराजी समोर आली. यावेळी त्यांनी यापुढे काँग्रेसचा प्रचार करणार नाही. त्याचबरोबर माझ्या मतदार संघातील उमेदवार वर्षा गायकवाड यांचाही मी प्रचार करणार नाही पण माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना त्यांचा प्रचार करायला सांगेन, असे ते म्हणाले होते. यानंतर वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

आज शनिवारी (ता. 27 एप्रिल) काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ज्यानंतर काही वेळातच पक्षाच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड या त्यांची भेट घेण्याकरिता त्यांच्या कार्यालयावर पोहोचल्या. या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले की, नसीम खान यांचे आणि माझ्या कुटुंबाचे जुने नाते आहे. माझे वडील होते, तेव्हापासून ते आमच्यासोबत एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे मी आता लहान बहिण म्हणून त्यांच्या भेटीसाठी आले, असे वर्षा गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, नसीम खान हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहेत. ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी, नेते सोनिया गांधी यांचे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या प्रचारासाठी यावे आणि माझ्यासोबत प्रचारात उभे राहावे, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांच्याकडून करण्यात आले. ज्यावेळी बहिणीला भावाची गरज असते, तेव्हा भाऊ सोबत उभा राहतोच, त्यामुळे नसीम खान देखील सोबत राहतील, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.