कोल्हापूर : हॉटेलमधील चौघा कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ग्राहकांच्या बिलाची रक्कम स्वत:च्या क्यूआर कोडव्दारा आपल्या बॅँक खात्यात वळवून दोन वर्षात १८ लाखाचा अपहार केल्याची घटना घडली आहे. अपहार झाला असल्याची गोष्ट मालकाच्या लक्षात आल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हिराकांत श्रीपतराव पाटील (वय ४६, रा. शुभम अपार्टमेंट, नागाळा पार्क) असं फिर्यादीच नाव असून बाळ उर्फ केवल अनंता म्हात्रे (रा. पनवेल, रायगड), विलास विकास नेमण (रा. करंजफेण, ता. पन्हाळा), अनिल भाऊ कांबळे (रा. सावर्डे, ता. शाहूवाडी), आकाश धनाजी पाटील (कोडोशी, ता. भुदरगड) अशी संशयित गुन्हेगारांची नावे आहेत.

फिर्यादी हिराकांत पाटील हे एच. पी. हॉटेल्स या नावाने कोल्हापूर शहरात हॉटेल्स व लॉजिंग व्यवसाय करतात. याच्या अंतर्गत शहरातील हॉटेल दर्शन व हॉटेल ॲट्रीया ही येतात. हॉटेल दर्शनमध्ये आलेल्या ग्राहकांच्या बिलाची ऑनलाईन रक्कम स्विकारण्यासाठी कॅश काऊंटरवर क्युआर कोड स्कॅनर ठेवलेला आहे.संशयीत कर्मचारी बाळ उर्फ केवल म्हात्रे याने इतर तिघा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा स्कॅनर काढून तेथे संशयित आकाश पाटील याच्या बॅँक खात्यावर पैसे जमा होईल, यासाठी त्याचा स्कॅनर ठेवला. तसेच रोख स्वरुपात जमा होणाऱ्या बिलाची रक्कम स्वत:कडे ठेवून घेतली. अशा प्रकारे २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत दोन्ही हॉटेलमधील जमा झालेल्या बिलातील एकूण १८ लाखांचा अपहार केला.