सोलापूर (प्रतिनिधी) : मागील ६० वर्षात एसटी महामंडळ विलीनीकरण करण्याचा  मुद्दा समोर आला नव्हता. मात्र, आता विरोधकांकडून मुद्दामहून हा प्रश्न पुढे आणला जात आहे. विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून सुरू आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पंढरपुरात कार्तिक यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केल्यास राज्यातील सर्वच महामंडळाचे विलीनीकरण करावे लागेल. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील आदींच्या संघटना अशी मागणी करु शकतात. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होईल.

राज्याला उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. अजून आर्थिक घडी नीट बसलेली नसून पगार, पेन्शन आणि दैनंदिन खर्च तसाच असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या वरील राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.