नवी दिल्ली : आयकर विभागाने पादत्राणांचा व्यवसाय करणाऱ्या तीन मोठ्या व्यावसायिकांच्या घरी  धाड  टाकली आहे. आतापर्यंत या कारवाईमध्ये 40 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या धाडीत एवढे पैसे सापडलेत की, अधिकारी मशिनच्या सहाय्यानं पैसे मोजून मोजून पुरते थकून गेले आहेत.या चप्पल व्यावसायिकांकडे इतके बक्कळ पैसे मिळालेत की अधिकारी पैसे मोजून थकले पण पैसे काही संपेनात अशी परिस्थिती निर्माण झाली. आतापर्यंत 50 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून हा आकडा 100 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आयकर विभागानं शनिवारी एमजी रोडच्या बीके शूज, धाकरणच्या मनशु ​​फूटवेअर आणि हिंग मंडीच्या हरमिलाप ट्रेडर्सवर एकत्रित कारवाई केली. तिनही व्यावसायिकांच्या घरी सापडलेली नोटांची बंडलं मोजण्यासाठी बँकांकडून नोटा मोजण्याची यंत्र मागवण्यात आलीत, तरी बंडलं काही संपण्याचं नाव घेईनात. उत्तर प्रदेशातील आगरामध्ये पादत्राणांचा व्यावसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर आयकर विभागानं केलेली छोपेमारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 ते 55 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून तिन्ही चप्पल व्यावसायिकांच्या घरातून जप्त करण्यात येणाऱ्या रोकडेचा आकडा 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो,असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. व्यावसायिकांच्या घरातील गाद्यांमध्ये, सोफ्यामध्येही रोकड लपवण्यात आली होती. सापडलेली रक्कम मोजण्यासाठी तब्बल अर्धा डझन मशीन सतत काम करत होत्या. पण नोटांची बंडलं काही संपण्याचं नाव घेईनात. अद्यापही आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. 

ज्या व्यावसायिकांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे, त्यांची कंपनी मुख्यत्वे नकदी स्वरुपातच व्यवहार करते. विशेषतः छोटे विक्रेत्यांसोबत नकदी स्वरुपातील व्यवहार केला जातो. यासाठी कंपनीकडून बिलही दिलं जात होतं. संपूर्ण व्यवहार ब्लॅकमध्ये केला जात होता. पावत्यांमार्फत हिशोब ठेवला जात असल्याची महिती सूत्रांकडून देण्यात आलीये.