हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने इराणच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, बचाव पथकांनी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष शोधून काढले आहेत आणि बर्फाच्छादित डोंगराळ भागात घडलेल्या या अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री जिवंत असण्याच्या आशा मावळल्या आहेतइब्राहिम रईसी आणि हुसेन अमीर अब्दुलहियान यांचे हेलिकॉप्टर रविवारी कोसळले होते. त्यात या दोघांव्यतिरिक्त इतर अनेक इराणी अधिकारीही होते.

राष्ट्रपती रईसी आणि अब्दुलहियान यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व अधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. दुर्घटनेनंतर रईसी आणि अब्दुलहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर जळून खाक झाल्याचे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनेही रईसी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

रईसी आणि इतर अधिकारी अमेरिकन बनावटीच्या बेल 212 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यावेळी हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. दुर्घटनास्थळाची पाहाणी केल्यानतंर हेलिकॉप्टरमधील एकही प्रवासी जिवंत असण्याची शक्यता दिसत नसल्याचे इराणचे रेड क्रेसेंट प्रमुख पीर हुसेन कोलिवंद म्हणाले होते. घटनास्थळ अत्यंत दुर्गम ठिकाणी असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी बचाव पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली, असे सांगण्यात येते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या उत्तरेकडील दाट धुक्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागल्याने रविवारी अपघात झालेल्या हेलिकॉप्टरच्या ताफ्यातील एका हेलिकॉप्टरला ‘हार्ड लँडिंग’ करावी लागली. इराण-अझरबैजान सीमा भागातून परतताना राष्ट्राध्यक्ष रईसी देशाच्या वायव्येकडील तबरीझ शहराकडे जात असताना ही दुर्घटना घडली.

सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि रईसी यांच्या नेतृत्वाखाली इराणने गेल्या महिन्यात इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला होता. याशिवाय इराणचे युरेनियम संवर्धनही, शस्त्रे बनवण्यासाठी आवश्यक पातळीच्या जवळपास पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

मोदींकडून शोकसंवेदना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हेलिकॉप्टर दर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रईसी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. भारत आणि इराणमधील संबंध दृढ करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या शोकसंवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी आहे, असे मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.