मुरगूड (प्रतिनिधी) : हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याची सुकन्या स्नेहा किरण चौगुले हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती महाराष्ट्रातील एकमेव महिला मल्ल आहे. तिची आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने या स्पर्धेसाठी ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने तिला आज (गुरुवार) आर्थिक मदत देण्यात आली.

स्नेहा ही मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल (साई आखाडा) येथे चार वर्षापासून कुस्ती प्रशिक्षण घेत आहे. कुस्तीसाठी लागणारा खुराक आणि सरावासाठी तिला दरमहा मोठा खर्च करावा लागत आहे. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असल्याने तिला पुढील स्पर्धेसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सोमवार दि. २४ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या सब ज्युनियर कॅडेट कुस्ती स्पर्धेत ४९ किलो वजनगटात तिने सुवर्णपदक पटकावले.

३ जुलैपासून उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे तिचे सराव शिबिर सुरू होत आहे. त्यानंतर ती १९ ते २५ जुलै २०२१ अखेर जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी हंगेरी या देशात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेसाठी तिला फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून धनादेश देण्यात आला. या प्रसंगी डॉ. सुनील चौगले, पांडुरंग चौगले, यशवंत चौगले व किरण चौगुले उपस्थित होते.