टोप (प्रतिनिधी) : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामाला २ डिसेंबर नंतर सुरूवात होईल, असे लेखी आश्वासन जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यानी दिले. त्यानंतर सरपंचानी पुकारल्या आमरण उपोषणाला स्थगित देण्यात आली.

मौजे वडगाव येथे गेल इंडिया कंपनीच्या प्रोजेक्टसाठी लागणारी जमीन देण्यासाठी जिल्हापरिषद, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतून एक मताने होकार देण्यात आला. त्यानंतर कंपनीच्या सीएसआर फंडातून गावच्या विकासासाठी निधी देण्याचे ठरले. त्यानुसार गावात ३ कोटी १७ लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर झाल्यानंतर टेंडर काढण्यात आले. पण काही करणावस्त हे काम मागील काही वर्षापासून रखडले होते. त्यामुळे  कै. माजी सरपंच मुबारक बारगिर, सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच किरण चौगुले, तंटामुक्त समिती अध्यक्ष महेंद्र कांबरे, विजय मगदूम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत, जिल्हापरिषदेच्या समोर १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार आज (बुधवार) जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांनी सरपंचांसह नेते मंडळींना बोलावून घेऊन रखडलेल्या रस्त्याच्या कामाला २ डिसेंबर नंतर सुरूवात करण्यात येईल, असे लेखी पत्राद्वारे सांगून उपोषण स्थगित करण्यास सांगितले. ते पुढे म्हणाले की, या कामाची जी निविदा मागविण्यात आली आहे त्यामध्ये काही तृटी असतील, तर नविन निवीदा काढण्यात येईल. गेल इंडिया कंपनीच्या सीआरएस फंडातून ही रक्कम गावच्या विकासासाठी देण्यात आली आहे. या फंडाशी निगडीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हा फंड गावच्या विकासासाठीच लागणार आहे, असे त्यानी सांगितले.

यावेळी उपसरपंच किरण चौगुले म्हणाले की, गावच्या विकासासाठी सदैव झटणारे माजी सरपंच मुबारक बारगीर यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याच्या कामाला चालना मिळाली. पण त्यांच्या निधनानंतर हे काम रखडले. सरपंच, उपसरपंच, सदस्य, नेते मंडळी यानी माजी सरपंच मुबारक बारगीर यांच्या पावलावर पाऊल ठेवत पाठपुरावा केला, आणि ३ कोटी १७ लाखाचा निधी मंजूर झाला. कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याने कामाचा शुभारंभ लवकर होण्यासाठी गावकऱ्यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. आज अमन मित्तल यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच काशिनाथ कांबळे,  उपसरपंच किरण चौगले, तंटामुक्त समिती अध्यक्ष महेंद्र कांबरे, विजय मगदूम, उदय चौगुले, रमेश लोंढे, नितीन घोरपडे, राजकुमार थोरवत, संतोष लोंढे, बशीर हजारी आदी उपस्थित होते.