कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील महाद्वार रोड येथील एका कपड्याच्या दुकानामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने यासह सुमारे १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी किरण प्रेमराज हेगडे (वय २६, रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

राजलक्ष्मीनगर येथील किरण हेगडे या कपडे खरेदी करण्यासाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी महाद्वार रोडवरील एका कपड्याच्या दुकानांमध्ये कुटुंबासह गेल्या होत्या. त्या कपडे खरेदी करत असताना किरण हेगडे यांच्याकडील सोन्याची चेन, चांदीचा छल्ला, मेखला व २५ हजार रुपये रोख असणारी पर्स चोरट्यांनी लंपास केली. काही वेळानंतर पर्स चोरीला गेल्याचे किरण हेगडे यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.