कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) शिरढोण (ता. शिरोळ) येथे ऊसाच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. शालन प्रकाश कलाल (वय 50 रा. आसरानगर, इंचलकरंजी) असे मृत महीलेचे नाव आहे. शिरढोण येथील दर्गा चौकातील वळणावर हॉटेल मुन्नराजूच्या समोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रॅक्टचालक फरार झाला आहे.

घटनास्थळांवरुन मिळालेल्या माहितीनुसार शिरढोण येथून ऊसाने भरलेला अंगद (दोन चाकी) ट्रॅक्टर (क्रमांक – एम एच 44 डी – 4098) गुरुदत्त साखर कारखाना टाकळीवाडीकडे जात होता. ट्रॅक्टर दर्गा चौकात वळण घेत असताना कुरुंदवाडहून इंचलकरंजीच्या दिशेने मयत शालन आपल्या मुलाच्या मोटासायकवरुन (क्रमांक एम एच 09 ए 0135) जात असताना वळणावर तोल गेल्याने शालन या अंगद ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली पडल्या.

अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा संतोष प्रकाश कलाल विरुद्ध दिशेने पडल्याने किरकोळ जखमी झाला. मुख्य रस्त्यावरच हा अपघात झाल्याने वाहतूकीची कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान या अपघाताने ऊस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा प़ंचनामा करुन मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.