सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी दंड थोपटल्याने भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. माढ्यात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते-पाटील तर महायुतीकडून रणजीतसिंह नाईक-निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जंगी सभांचे आयोजन केले जात आहेत. यावेळी नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी माढ्यातील सभेचा समाचार घेतना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जहरी वार केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. मुख्यमंत्री असूनही गैरव्यावहार केल्याने भाजप सरकारने त्यांच्यावर कारवाई केल्याचे बोलले जाते. याचे उदाहरण देत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा दिला आहे. पंढरपूरमध्ये आलेले लाड म्हणाले, कोरोना काळात मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गैरव्यावहार केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल वाचले नाहीत, त्याप्रमाणे आता उद्धव ठाकरेही वाचणार नाहीत, असे लाड म्हणाले.

भाजप आणि भाजपनेत्यांवर टीका करताना ठाकरेंनी, मी शेण खातो म्हणून तुम्ही खाता का? असा प्रश्न विचारला होता. यावर लाड म्हणाले, देशामध्ये एक पप्पू आहे तसा राज्यामध्ये सुद्धा एक उध्दव नावाचा पप्पू आहे. ते शेणच काय शेणाच्या पलीकडेचेही खातील. त्यांच्यासाठी ते दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, असा शब्दात लाड यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.

शिवसेनेच्या जाहिरातीत पॉर्नस्टारचा वापर असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. यावर लाड म्हणाले, युवराज यांना हे नवीन नाही. संध्याकाळ झाली की तेच आहे. त्यामुळे त्यांना ते नवीन नाही. मोहिते पाटलांना जवळ केले ही आमची चूक होती. त्याबद्दल मी माफी मागतो. तर बारामतीतून सुनेत्रा पवार Sunetra Pawar या एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून येतील. निवडणुकीत मशालीची आईस्क्रीम होईल, तुतारी वाजणार नाही आणि पंजा गळून पडेल, अशी महाविकास आघाडीची अवस्था होईल, असाही टोला लाड यांनी लगावला आहे.