रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच राहिल्याने राजकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका लावला जात आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात उद्या केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जाहीर सभा घेणार आहेत. जवाहर मैदानावर उद्या  3 मे रोजी दुपारी 1  वाजता हि सभा  होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिली.

अमित शाह या सभेनिमित्त रत्नागिरीत पहिल्यांदाच येत असून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर 25 ते 30 हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

याआधी फडणवीस यांनी राजापूर येथे नारायण राणेंसाठी सभा घेतली. आता अमित शाह येणार आहेत. या सभेकरिता मंडप व्यवस्था पूर्ण झाली आहे. पूर्ण मैदानावर मंडप आहे, त्यात सुमारे 25 ते 30 हजार लोक एका वेळेला बसू शकतात. सभेला येणाऱ्या लोकांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी या सभेकरता उपस्थित राहणार आहेत.

ही सभा ऐतिहासिक होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असे  रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वी अमित शाह यांची सभा 24 एप्रिल रोजी होणार होती मात्र हा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता ही सभा तीन मे रोजी होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

या सभेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, किरण सामंत, लोकसभा सहप्रभारी तथा माजी आमदार बाळ माने, बाबा परुळेकर, डॉ. हृषीकेश केळकर, अतुल काळसेकर, सुजाता साळवी, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, प्रमोद जठार, राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजश्री विश्वासराव, प्रमोद अधटराव यांच्यासमवेत, सर्व विधान सभाप्रमुख सर्व पदाधिकारी सक्रिय नियोजन करत आहेत.