कसबा बावडा (प्रतिनिधी) : कसबा बावडा परिसरातील एका इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सविता रवींद्र मोहिते असे त्यांचे नाव असून हा प्रकार आज (रविवार) सकाळी सातच्या सुमारास घडला. शाहूपुरी पोलिसात या घटनेची नोंद झालीय.

बँक कर्मचारी असलेले रवींद्र मोहिते हे कसबा बावडा – कदमवाडी रोडवरील ‘वसंत निवारा’ या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतात. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या पत्नी सविता घराच्या बाल्कनीत उभ्या असताना तोल जाऊन खाली कोसळल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सविता यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज दुपारी एकच्या सुमारास सविता यांचा मृत्यू झाला. मोहिते दाम्पत्याला सहा वर्षांची मुलगी आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळ मोहिते कुटुंबियांना धक्का बसला आहे.